रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बाजारपेठा, चौक, बसस्थानके आणि सर्व्हिस रोडवर वाहने बेशिस्तपणे उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पोलिस दैनिक गुन्हे नोंद अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ४४ स्वतंत्र प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
खेड, दापोली, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, गुहागर, मंडणगड, राजापूर, सावर्डे, जयगड, देवरूख, दाभोळ, नाटे तसेच रत्नागिरी शहर व ग्रामीण परिसरात ही कारवाई करण्यात आली. बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांच्या वाहतुकीसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नरेश रमेश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर भरणे नाका उड्डाणपुलाखाली वाहन उभे केल्याप्रकरणी सचिन यशवंत गोवळकर याच्यावर कारवाई झाली. रामपूर बाजारपेठेतील एसटी स्टॉपसमोर वाहन उभे केल्याप्रकरणी जितेंद्र कृष्णा कासार, तर भरणे नाका हायवे ब्रिजवर ट्रक उभा केल्याप्रकरणी सुरेंद्र रामचंद्र चिले याच्यावर कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरातही कारवाईचा धडाका पाहायला मिळाला. जयस्तंभ-रहाटाघर मार्गावरील आठवडा बाजार परिसरात वाहन उभे केल्याप्रकरणी महेश अजित भानुशाली याच्यावर, तर रेल्वे स्टेशन फाटा-खेडशी सर्व्हिस रोडवर वाहन उभे केल्याप्रकरणी कलपेश अरुण राणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. चुलीवरील फरसाण दुकानासमोर टेम्पो उभा केल्याप्रकरणी योगेश यशवंत शेलार याच्यावरही कारवाई करण्यात आली.
लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील भूमी अभिलेख कार्यालयासमोर वाहन उभे केल्याप्रकरणी संतोष महादेव सुतार याच्यावर, तर बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांप्रकरणी प्रवीण रामचंद्र रहाटे, जुबेर इस्माईल गिरकर, संजय रघुनाथ देसाई आणि फिरोज जैनुद्दीन हुना यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दापोलीत एसटी स्टँडच्या आवारात व्हॅगनर कार उभी करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी सुधीर अनंत बुरटे याच्यावर गुन्हा दाखल झाला. दापोली-खेड मार्गावर तुळशी दुकानासमोर वाहने उभी केल्याप्रकरणी कैलास सयाजी माने आणि विनोद विलास धोपट यांच्यावर कारवाई करण्यात आली. दापोली-मंडणगड मार्गावरील बी.के. इलेक्ट्रिकल दुकानासमोरही बेशिस्त पार्किंगची नोंद करण्यात आली.
संगमेश्वर, गुहागर आणि सावर्डे परिसरातही कारवाई करण्यात आली. माखजन बाजारपेठेतील एसटी स्टँडजवळ जीप उभी केल्याप्रकरणी रघुनाथ शांताराम गुरव याच्यावर, तर पिंपळी बुद्रुक येथील हॉटेलसमोर टेम्पो उभा केल्याप्रकरणी रियाज दाऊद मुकादम याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुहागरमधील शृंगारतळी पोलिस चौकीसमोर रिक्षा उभी केल्याप्रकरणी वैभव यशवंत मांडवकर याच्यावर कारवाई झाली. सावर्डे येथील वहाळफाटा परिसरातही दोन स्वतंत्र प्रकरणे नोंदविण्यात आली.
राजापूर, जयगड, मंडणगड आणि देवरूखमध्येही बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई करण्यात आली. राजापूरमधील तबरज चौक, मांडवी नाका आणि एसटी डेपो परिसरात वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. जयगड येथे ओंकार अशोक पंडित, देवरूख येथे ओम सुरेंद्र सावंत, मंडणगड येथे दिलीप किसनराव ढमाले आणि वेसवी येथे जितेंद्र रमेश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
चिपळूणमध्ये मध्यवर्ती एसटी स्टँडजवळ किंग सुपर मार्केटलगत फोर्स ट्रॅव्हलर उभे केल्याप्रकरणी महेश मारुती दळवी याच्यावर कारवाई करण्यात आली. दाभोळ-उसगाव मार्गावर धोरसई पुलाजवळ पिकअप उभी केल्याप्रकरणी विनायक विठ्ठल पदुकळे, तर अलोरे-शिरगाव बाजारपेठेत बोलेरो पिकअप उभी केल्याप्रकरणी अमाननुल्ला उस्मान देवळेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, पोलिसांनी केवळ बेशिस्त पार्किंगवरच नव्हे तर वाहने हयगयीने व बेदरकारपणे चालविणाऱ्या चालकांवरही कारवाई केली आहे. लांजा येथील आंजणारी पूल आणि धनावडे शेती फार्म परिसरात अशा प्रकारच्या घटना नोंदविण्यात आल्या.
नाटे येथे दारूच्या नशेत वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यासोबतच आरडाओरड व हातवारे करून गोंधळ घातल्याप्रकरणी चैतन्य नंदकिशोर मोदी याच्याविरोधात मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













