संगमेश्वर : आंगवली येथे रिक्षा पलटी, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय काशिराम चव्हाण (५२, रा. बोंड्ये) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय चव्हाण हे प्रवाशांना आणण्यासाठी रिक्षाने जात होते. आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारावरून जात असताना त्यांची रिक्षा अचानक पलटी झाली. या अपघातात चव्हाण यांच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच आंगवलीचे माजी सरपंच संतोष अणेराव, पोलीस पाटील सतीश अणेराव, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, अनंत जाधव, ललिता गुडेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने विजय चव्हाण यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच बोंड्ये परिसरातील ग्रामस्थ तसेच देवरूख परिसरातील रिक्षाचालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.

या दुर्दैवी घटनेमुळे बोंड्ये परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चव्हाण यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *