खेडमध्ये सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा; पाच वाहनचालकांवर गुन्हे

banner 468x60

सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास खेड-दापोली मार्ग तसेच भरणे पुलाखाली हे प्रकार घडले.

खेड-दापोली जाणाऱ्या मार्गावर अमोल अशोक शेलार (वय ४२, रा. जामगे, ता. खेड) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एमएच ०८ बीबी ९००२ रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती की, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २४०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर भरणे पुलाखाली चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या चार स्वतंत्र प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तुषार नानाजी कदम (वय ४०, रा. काने लक्ष्मीनारायण, ता. चिपळूण) याच्याविरोधात गुन्हा क्रमांक २४१/२०२६, सुहास बाबाजी जाधव (वय ४३, रा. ऐनवरे, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा क्रमांक २४२/२०२६, अमर शंकर मोरे (वय ४८, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा क्रमांक २४३/२०२६, तर नितेश धोंडू हंबीर (वय ३५, रा. कळंबणी बुद्रुक, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा क्रमांक २४४/२०२६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईत रस्त्यावर वाहने अशा प्रकारे उभी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले की, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होण्यासोबतच पादचाऱ्यांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.

सर्व पाच प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड परिसरातील रस्त्यांवर वाहतूक वाढण्याची शक्यता असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *