रत्नागिरी : 4 जिल्ह्यांतून हद्दपार केलेला संशयित रत्नागिरीत आढळला, पोलिसांत गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला संशयित रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात आढळून आल्याने त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, २४ ऑगस्ट रोजी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.


अमिर नजिर मुजावर (४०, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार दिपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिर मुजावर याच्याविरोधात रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ) अन्वये कारवाई केली होती. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश १४ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता.

हद्दपारीचा आदेश लागू असतानाही संशयित अमिर मुजावर हा सोमवारी रात्री रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात आढळून आला. त्यामुळे त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १४१, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *