मंडणगडमध्ये घरफोडी, 15 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील सर्ले-बौद्धवाडी येथे घरातील कपाटाची चावी घेऊन कपाटातून तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दि. २९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्ले-बौद्धवाडी येथील फिर्यादी संगीता बाळकृष्ण तांबे (वय ६५) यांच्या राहत्या घरात चोरी झाली.

संगीता तांबे यांनी कपाटाची चावी घरातील जुन्या टीव्हीच्या मागे ठेवली होती. ही चावी कुठे ठेवली आहे, हे आरोपींनी पाहिले होते. त्यानंतर आरोपींनी ती चावी घेऊन कपाट उघडले आणि त्यातील सोन्याचे दागिने एकमेकांच्या संगनमताने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी नरेंद्र बाळाराम तांबे, महेंद्र बाळाराम तांबे, मालती नरेंद्र तांबे आणि मीना महेंद्र तांबे (सर्व रा. सर्ले, बौद्धवाडी, ता. मंडणगड) यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३५ वाजता गुन्हा क्रमांक ९५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (अ) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या चोरीत एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *