संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी कोसळल्याने फणसवणे-उमरे फाट्यावर बुधवारी सकाळी थरारक घटना घडली. विद्युतप्रवाह असलेली वाहिनी बसच्या संपर्कात आल्याने वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली. चालक रवींद्र साप्ते यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षित राहिले. बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
संगमेश्वर बसस्थानकातून सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी बस घेऊन चालक रवींद्र साप्ते आणि वाहक प्राजक्ता शिगवण हे निघाले होते. बस फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर, रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असता विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण अचानक तुटला. त्यामुळे विद्युतप्रवाह असलेली वाहिनी थेट धावत्या एसटी बसवर कोसळली.
विद्युतवाहिनी बसच्या संपर्कात येताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना जोरदार विजेचा धक्का बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमध्ये काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिगवण यांनी तत्काळ सीटचा आधार घेतल्याने त्या खाली पडल्या नाहीत. दरम्यान, विद्युतप्रवाह खंडित झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेत शिगवण यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने विद्युतवाहिनीच्या थेट संपर्कात आले नाहीत. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. बसमध्ये असलेला एकमेव प्रवासीही सीटला टेकून बसला होता. त्याच्या पायात चप्पल असल्याने त्यालाही विजेचा धक्का जाणवला नसल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. विद्युतवाहिनी बसवर पडल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणला घटनेची माहिती दिली. त्यानंतर लाइनमन होडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्युतप्रवाहाची परिस्थिती तपासून विद्युतवाहिनी हटवली आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला.
या घटनेमुळे रस्त्यालगत असलेल्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील विविध भागांमध्ये जीर्ण विद्युत खांब, तारा तसेच वाहिन्यांबाबत नागरिकांकडून यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात एसटी बस, खासगी वाहने आणि दुचाकींची वाहतूक होत असते. अशा ठिकाणी विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महावितरणने रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबांची, सपोर्ट वायरची आणि वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी. जीर्ण अथवा धोकादायक यंत्रणा त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
फणसवणे येथील या घटनेत बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने तसेच चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र धावत्या एसटी बसवर विद्युतवाहिनी कोसळण्याच्या या घटनेने सार्वजनिक वाहतूक मार्गालगतच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













