देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. वासुदेव गणपत कांबळे (वय ५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) असे मृत खलाशाचे नाव आहे. या घटनेमुळे देवगड बंदर परिसरात खळबळ उडाली असून, देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास नारायण खांदारे यांच्या मालकीच्या ‘एकदंत’ या नौकेवर वासुदेव कांबळे हे दशरथ बोराटे यांच्यासोबत खलाशी म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री सर्वजण नौकेवर झोपले होते. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास वासुदेव कांबळे हे नौकेवर दिसून आले नाहीत.
कांबळे यांचा नौकेवर तसेच बंदर परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, बराच शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे दशरथ अशोक बोराटे (वय ३८, मूळ रा. गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) यांनी देवगड पोलीस स्थानकात कांबळे बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांकडून तसेच स्थानिकांकडून शोधमोहीम सुरू असतानाच कांबळे यांचा मृतदेह देवगड बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली.
वासुदेव कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘एकदंत’ नौकेवर खलाशी म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कांबळे नौकेवरून नेमके कसे बेपत्ता झाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीच्या पाण्यात कसा आढळला, याबाबत देवगड पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणी देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













