गुहागर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन गुहागर एसटी आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बस दाखल झाल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या बसचे गुहागर आगारात उत्साहात लोकार्पण करण्यात आले.
गुहागर आगारात आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या बसचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते पाचही ‘राजमाता जिजाऊ’ बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोडकाआगर मार्गावर पहिली फेरी
लोकार्पण सोहळ्यानंतर नव्या बसची गुहागर ते मोडकाआगर या मार्गावर पहिली फेरी काढण्यात आली. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः तिकीट काढून या बसमधून प्रवास केला. त्यामुळे नव्या बसच्या सेवेला प्रत्यक्ष प्रवासाने सुरुवात झाली.
गुहागरला एकूण दहा बस मिळणार
यावेळी बोलताना पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले की, गुहागर एसटी आगारासाठी एकूण दहा ‘राजमाता जिजाऊ’ बस देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्यापैकी पहिल्या पाच बस गुहागर आगारात दाखल झाल्या असून उर्वरित पाच बसही लवकरच उपलब्ध होणार आहेत.
गुहागर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या आणि गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता एसटीची उपलब्धता वाढविणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पाच मिनीबसचीही मागणी
दरम्यान, गुहागर तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन गुहागर आगाराला पाच मिनीबस उपलब्ध करून देण्याची मागणीही परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी या मिनीबस उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नव्या बसमुळे गुहागर तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि सुरक्षित एसटी सेवा मिळण्यास मदत होणार असून, गणेशोत्सवाच्या काळातील वाढती प्रवासी गर्दी हाताळण्यासाठीही या बस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या कार्यक्रमाला नगरसेवक अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, साईनाथ कळझुणकर, सचिन ओक, प्रभारी गुहागर आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, वाहतूक निरीक्षक स्वप्नील शिंदे, मंदार कदम, विजय चव्हाण, पराग कांबळे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













