रत्नागिरी : मच्छिमारी बोटीवर 65 वर्षीय खलाशाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरीत मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीवरील ६५ वर्षीय खलाशाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. लक्ष्मण पांडूरंग डावकरे (वय ६५, रा. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डावकरे हे सडामिऱ्या, रत्नागिरी येथील दिनेश शिवाजी सावंत यांच्या मालकीच्या ‘पुष्पगंधा’ या मच्छिमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होते. १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता तांडेल सुशांत सुधाकर महाकाळ आणि इतर खलाशांसह ते मिरकरवाडा बंदरातून मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते.

समुद्रात मच्छिमारी सुरू असताना डावकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते बोटीमध्ये कोसळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच बोट तातडीने मिरकरवाडा बंदरात परत आणण्यात आली.

यानंतर डावकरे यांना खासगी वाहनातून उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.५८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची रात्री १०.५३ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *