दापोली : साथी चंदूभाई मेहता जन्मशताब्दी निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

banner 468x60

साथी चंदूभाई मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दापोली तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय, दापोली येथे उत्साहात पार पडला.

banner 728x90

विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, विचारक्षमतेला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच सामाजिक व समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी चिंतन करावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गट क्रमांक एकमध्ये दापोली तालुक्यातील ३० शाळांमधून तब्बल ५२६ निबंध, तर गट क्रमांक दोनमध्ये ११ महाविद्यालयांमधून २६२ निबंध प्राप्त झाले. दोन्ही गटांत मिळून तब्बल ७८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त सुधीर देसाई, कार्यक्रम संयोजक डॉ. कुणाल मेहता, परीक्षकांच्या वतीने अमोल नलावडे व डॉ. सई प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठानचे सदस्य, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साथी चंदूभाई मेहता आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करण्यात आले. प्रा. कैलास गांधी यांनी साथी चंदूभाई मेहता यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा परिचय करून दिला.

शालेय गटात उत्कर्ष तोडणकर प्रथम

गट क्रमांक एकमध्ये संजीव शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा उत्कर्ष तोडणकर याने प्रथम क्रमांक मिळविला. आर. जी. पवार माध्यमिक शाळा, माटवण येथील श्रेयस मुरचवडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. ए. जी. हायस्कूल, दापोली येथील पूर्वा मांढरे आणि न्यू इंग्लिश स्कूल, तळसुरे येथील वेदांती शिंदे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

महाविद्यालयीन गटात वैष्णवी लखमदे अव्वल

गट क्रमांक दोनमध्ये ए. जी. हायस्कूल, दापोली येथील वैष्णवी लखमदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वराडकर महाविद्यालयातील दाभोळकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वराडकर महाविद्यालयातील साक्षी जाधव आणि नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिमाज सौतिरकर यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख २,५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १,५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये तसेच चषक, पुस्तक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाची दखल घेत सात उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली. सुरुवातीला केवळ दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांचे नियोजन होते; मात्र स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता ही संख्या सात करण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षण सौ. शारदा गांगुर्डे, अमोल नलावडे, डॉ. गौतमी पाटील, डॉ. सई प्रभू, प्रा. लीना केदारे, सौ. सीमा देसाई, प्रा. रोहिणी पवार आणि श्रीमती देशपांडे यांनी केले.

ग्रामीण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे : अतुल पेठे

प्रमुख पाहुणे अतुल पेठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कला, लेखन, अभिनय आणि सर्जनशीलतेला जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून, योग्य संधी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते शहरातील विद्यार्थ्यांपेक्षाही पुढे जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना योग्य दिशा देऊन आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष मराठे यांनी केले. डॉ. कुणाल मेहता यांनी निबंध स्पर्धेबाबत माहिती दिली. अमोल नलावडे यांनी परीक्षण प्रक्रियेबाबत मनोगत व्यक्त केले. सचिन मेहता यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली, तर सुधीर देसाई यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा. तेजस मेहता यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विनय मेहता यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर देसाई, सचिन मेहता, विनय मेहता, डॉ. कुणाल मेहता आणि प्रा. तेजस मेहता यांनी विशेष मेहनत घेतली. दशानेमा गुजर युवक संस्थेच्या सदस्यांसह डॉ. जयवंतशेठ जालगावकर आणि संदिप दिवेकर यांचेही सहकार्य लाभले.

७८८ विद्यार्थ्यांचा सहभाग, पालक-शिक्षकांची उपस्थिती आणि अतुल पेठे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साथी चंदूभाई मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, विचारक्षमतेला आणि सर्जनशीलतेला चालना देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *