रत्नागिरी : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, रत्नागिरीसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

banner 468x60

महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने आज, रविवार १६ ऑगस्ट रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा यलो अलर्टमध्ये समावेश आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होत असून, राज्यातील विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील काही दिवसांत कोकणातील बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घाटमाथ्यावर होणाऱ्या चांगल्या पावसामुळे शेतीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *