संगमेश्वर : देवरूख हायस्कूलचे शिक्षक राहूल सप्रे यांचे निधन, विद्यार्थी, शिक्षक व मित्रपरिवारातून हळहळ

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक राहूल रमेश सप्रे यांचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवरूख हायस्कूलसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

राहूल सप्रे सर हे शांत, प्रेमळ, मनमिळाऊ आणि आपुलकीने वागणारे शिक्षक म्हणून परिचित होते. विद्यार्थ्यांशी त्यांचा नेहमीच स्नेहपूर्ण संवाद असायचा. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते ही त्यांची विशेष ओळख होती.

सप्रे सरांच्या निधनाची बातमी समोर येताच देवरूख हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला. आपल्या आवडत्या शिक्षकाच्या अकाली निधनाने विद्यार्थ्यांमध्येही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकाऱ्यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला.

अल्पावधीतच आपल्या साध्या आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राहूल सप्रे यांच्या अकाली निधनाने सप्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राहूल सप्रे यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी ३ वाजता देवधामापूर येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, विद्यार्थी आणि मित्रपरिवाराच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *