मंडणगड : आंबेत पुलावरून 20 टन वजनापर्यंतची वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील 20 किमी प्रतितास वेगमर्यादा, प्रशासकीय आदेश जारी

banner 468x60

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दोन मोठ्या बार्जची धडक झाल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या या पुलावरून आता २० मेट्रिक टन वजनापर्यंतची सर्व प्रकारची वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पुलावरून वाहतूक करताना वाहनांना कमाल २० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू राहणार आहे.

banner 728x90

म्हाप्रळ-आंबेत पूल हा रा.मा. १०१ मार्गावरील महत्त्वाचा दुवा आहे. ६ जुलै २०२६ रोजी सावित्री खाडीत असलेल्या आंबेत पुलाला दोन मोठ्या बार्जची धडक बसली होती. या धडकेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, पुलाच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन १२ जुलैपासून दुचाकी आणि हलकी चारचाकी वाहने पूर्ण नियंत्रणाखाली पुलावरून सोडण्यात आली होती. मात्र, अवजड वाहनांची वाहतूक अद्याप बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी पूर्ण होणार आणि अवजड वाहतूक कधी सुरू होणार, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर मे. प्लानिस टेक्नॉलॉजी प्रा. लि., चेन्नई या संस्थेकडून आंबेत पुलाचे पाण्याखालील सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल ११ ऑगस्ट २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला. सदर अहवाल आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या अनुषंगाने पुलाच्या सुरक्षिततेबाबतचा आढावा घेण्यात आला.

या अहवालाच्या आधारे आंबेत पुलावरून २० मेट्रिक टन वजनापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सुरू करण्यास विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी रायगड आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.

मात्र, वाहतूक सुरू करताना २० किमी प्रतितास वेगमर्यादा पाळणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर वाहनांनाही पुलावरून नियंत्रित वेगाने प्रवास करावा लागणार आहे.

आंबेत पूल हा रायगडच्या म्हसळा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. पुलावरील अवजड वाहतूक बंद असल्याने वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत होता.

आता २० टन वजनापर्यंतची वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने मंडणगडसह आंबेत, म्हाप्रळ आणि परिसरातील नागरिक व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीनंतर वाहतूक प्रत्यक्षात पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २० किमी प्रतितास वेगमर्यादा आणि २० मेट्रिक टन वजनाची मर्यादा पाळणे अत्यावश्यक राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *