चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात विश्वासाला तडा देणारी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने घरफोडी करून तब्बल ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घरगुती मदतनीस ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
याबाबत सुयोग संतोष बेलवलकर (वय ३०, व्यवसाय – हॉटेल, रा. कळमुंडी, हनुमानवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ५ वाजल्यापासून १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ वाजेपर्यंत त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधण्यात आली. आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील दागिने, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश असून, एकूण चोरीचा ऐवज ५ लाख ८८ हजार ६०० रुपये इतका आहे.
या प्रकरणातील प्राथमिक तपासात घरात काम करणारी सौ. दिपीका दिलीप बोबले (वय ४०, रा. आवेरीवाडी, कळमुंडी, ता. चिपळूण) तसेच गणेश काशिराम गोरीवले (वय ३१, रा. कळमुंडी, ता. चिपळूण) यांचा सहभाग समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घरातील व्यक्तींच्या हालचालींची माहिती असल्याचा फायदा घेत आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यासाठी आणि घटनेतील इतर बाबींचा उलगडा करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत असून, आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













