रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ विशेष मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 530 ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक 31 जुलै 2026 रोजी पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, वालोपे येथील रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिराजवळ हातात पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करणारी एक व्यक्ती पथकाच्या निदर्शनास आली. पोलिसांनी त्याला दोन पंचांसमक्ष थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय 48, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण) असे सांगितले.
त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पांढऱ्या कापडी पिशवीतील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 530 ग्रॅम वजनाचा सुमारे ₹30 हजार किमतीचा गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासात हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 223/2026 अन्वये एनडीपीएस कायदा, 1985 मधील कलम 8(क), 20(ब) आणि 2(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे आणि रुपेश जोगी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













