Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा, जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश

banner 468x60

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण आणि मोठी दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गाचे चौपदरीकरण सुरू असून, आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. सततच्या मुसळधार पावसामुळे कि.मी. ६९.५०० ते ६९.६०० दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचण्याची शक्यता NHAI च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ जुलै २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत ट्रक, ट्रेलर, डंपर आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना आंबा घाटातून प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि हलकी प्रवासी वाहने नियंत्रित वेगाने व आवश्यक खबरदारी घेऊन या मार्गावरून प्रवास करू शकणार आहेत.

अवजड वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गही निश्चित केला आहे. रत्नागिरी–हातखंबा–पाली–अणुस्कुरा घाट–राजापूर–कोल्हापूर हा मुख्य पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आला असून, गरजेनुसार भुईबावडा किंवा फोंडा घाटाचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण आंबा घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, वाहतूकदारांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा वाहनचालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *