रत्नागिरी : ‘सिस्टम अपडेट’च्या बहाण्याने रत्नागिरीत ₹2.54 लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरातील नाचणे रोड परिसरात राहणाऱ्या एका मेडिकल सेल्समनची मोबाईलवरील कथित ‘सिस्टम अपडेट’च्या माध्यमातून ₹२ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण दिनेश घोलप (वय ३४, व्यवसाय – मेडिकल सेल्समन (एमआर), रा. रूम क्र. बी-१, दलाल हाऊस, अभ्युदयनगर, नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

घटना २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलमध्ये अचानक ‘सिस्टम अपडेट’ प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Google IPTV’ नावाचे अॅप डाउनलोड झाल्याचे निदर्शनास आले.

या प्रक्रियेनंतर फिर्यादी यांच्या ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच स्वतंत्र व्यवहारांद्वारे ₹२,५०,००० डेबिट करण्यात आले. तसेच त्यांच्या बचत खात्यातून UPI द्वारे ₹४,२०० वळते करण्यात आले. अशाप्रकारे एकूण ₹२,५४,२०० रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५१/२०२६ नोंद करण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या सायबर फसवणुकीचा तपास सुरू असून, नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी अॅप्स, अपडेट्स किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *