रत्नागिरी : न्यायालयात साक्ष दिल्याच्या रागातून कुटुंबावर कथित जीवघेणा हल्ला, 51 जणांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारवीवाडा परिसरात न्यायालयीन खटल्यात आरोपींविरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून एका कुटुंबावर गावातील जमावाने कथितपणे जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. घराचे दोन्ही दरवाजे तोडून आत घुसलेल्या जमावाने महिला, लहान मुले आणि पुरुषांना मारहाण केल्याबरोबरच घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिला कामिनी केशव पोवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तब्बल ५१ जणांविरोधात लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

banner 728x90

तक्रारीनुसार, २४ जुलै २०२३ रोजी गावातील काही व्यक्तींनी पोवार कुटुंबाच्या घरात घुसून शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी कामिनी पोवार यांनी रत्नागिरी न्यायालयात १८ जणांविरोधात खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी ७ जुलै २०२६ रोजी झाली होती. त्यावेळी कामिनी पोवार यांचे दीर विश्वास पोवार आणि जाऊ संयुक्ता पोवार यांनी न्यायालयात आरोपींविरोधात साक्ष दिली होती.

या साक्षीचा राग मनात धरून ९ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कामिनी पोवार यांचे पती कामानिमित्त मुंबईला गेल्याची संधी साधून गावातील ५१ जणांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह त्यांच्या घराभोवती जमा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अचानक मोठा जमाव घराबाहेर जमल्याने कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने दोन्ही दरवाजे तोडून घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना लक्ष्य करत बेदम मारहाण सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या हल्ल्यात संयुक्ता पोवार यांच्या खांद्यावर लाकडी दांड्याने वार करण्यात आल्याने त्यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच कामिनी पोवार यांच्या पोटावर गंभीर मार लागल्याने त्यांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. घरातील इतर सदस्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता घरातील फर्निचर, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मारहाण सुरू असताना कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेल्या कामिनी पोवार यांच्या नणंदेलाही जमावाने धमकावत, “परत आलीस तर ठार मारू,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार दुपारी सुमारे १२ वाजेपर्यंत सुरू होता, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पोवार कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, न्यायालयीन प्रक्रियेत सत्याची बाजू मांडणाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करून कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवर आधारित असून, संबंधित आरोपींची भूमिका तसेच पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *