Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 34 एटीएम कार्डे जप्त, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

banner 468x60

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

ही घटना रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात घडली होती. एका महिला ग्राहक नवीन एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी एटीएम केंद्रात गेल्या असता आरोपीने मदतीचा बहाणा करून त्यांच्या हातातील कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर महिलेचा मोबाईल घेऊन ओटीपीच्या माध्यमातून खात्याची पडताळणी केल्याचे नाटक करत त्यांच्या खात्यातील माहिती मिळवली. महिला एटीएम केंद्रातून बाहेर पडताच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे शहरात शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, मांडवी परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक संशयित व्यक्ती फिरताना आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील ठिकाणाची झडती घेतली असता विविध बँकांची एकूण ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, चोरी आणि दरोड्यासह आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *