दापोलीतील कोळथरे मुख्य रस्ता खड्ड्यात, वाहनचालकांसह प्रवाशांचा जीव टांगणीला

banner 468x60

प्रतिनिधी (सागर गोवळे)

दापोली तालुक्यातील कोळथरे मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. महाडिक स्टॉप ते कोळथरे दरम्यानचा रस्ता पूर्णपणे उखडला असून, संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जीवघेणा प्रवास; अपघाताची भीती

कोळथरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज एसटी बसेस, मालवाहू वाहने तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

विशेषतः ‘पंचनदी पार्क’ परिसरातील मोठमोठे खड्डे अत्यंत धोकादायक बनले असून, या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांसाठी ही समस्या आणखी गंभीर झाली आहे.

वाहनांचे नुकसान; शाळकरी मुलांनाही त्रास

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अनेकदा वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना तसेच इतर वाहनांना बाजू देताना मोठी कसरत करावी लागत आहे.


या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

तातडीने दुरुस्तीची मागणी

परिसरासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक तसेच कोळथरे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *