खेड : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सोहन चव्हाणची टीसीएसमध्ये निवड

banner 468x60

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी सोहन सुधीर चव्हाण याची देशातील अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनियर (ट्रेनी) पदासाठी निवड झाली आहे. सोहनच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्था, संगणक अभियांत्रिकी विभाग आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

banner 728x90

सोहनने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्यपूर्ण मेहनत, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि तांत्रिक कौशल्यांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. टीसीएसच्या बहुपदरी व स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत यशस्वी होत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. या यशामुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आहे.

संगणक अभियांत्रिकी विभाग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसाठी आवश्यक कौशल्यविकासावर सातत्याने भर देत आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पस भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत असून त्याचा सकारात्मक परिणाम प्लेसमेंटमध्ये दिसून येत आहे.

सोहनच्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. समीर ताठरे, संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जे. व्ही. खालकर तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याच्या उज्ज्वल व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना भविष्यातही तो आपल्या ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या बळावर संस्थेचे नाव उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोहनच्या या यशामुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. त्याच्या या यशातून प्रेरणा घेऊन भविष्यात संस्थेतील अधिकाधिक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्थान मिळवतील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *