रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, कारवांचीवाडी येथील बँकेच्या ताब्यात असलेल्या सीलबंद फ्लॅटचे कुलूप व सील तोडून बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेनंतर बँकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी आसिया अब्दुल रशीद मुक्री (वय ४०) आणि अब्दुल रशीद मुक्री (वय ४८, दोघे रा. गुलाब वाटिका अपार्टमेंट, कुवारबाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लोहीत जी. डी. यांनी याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार खेडशी येथील मंडळ अधिकाऱ्यांमार्फत बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाली शाखेला कुवारबाव येथील गुलाब वाटिका अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ चा कायदेशीर ताबा देण्यात आला होता. बँकेची संपूर्ण ताबा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित फ्लॅटला मंडळ अधिकाऱ्यांनी नियमानुसार सील लावून कुलूपबंद केले होते.
मात्र, ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी संशयितांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता फ्लॅटवरील शासकीय सील व कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्याचा ताबा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्याबरोबरच बँकेच्या कायदेशीर ताब्यातील मालमत्तेत अनधिकृत प्रवेश झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत घरात बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेचे नुकसान, शासकीय आदेशाचे उल्लंघन आदी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपशील, फ्लॅटवरील सील तोडण्याची परिस्थिती, संबंधित कागदपत्रे तसेच इतर पुराव्यांची पडताळणी सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













