खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

banner 468x60

खेड तालुक्यातील दहिवली येथील भीषण भूस्खलन दुर्घटनेनंतर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथे निर्माण झालेल्या संभाव्य भूस्खलनाच्या धोक्याची रविवारी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा आमदार योगेश कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

दहिवली भूस्खलन दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ८ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना घरबांधणीसाठी २ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, बाधितांना आवश्यक शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोटलवाडी परिसरातील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १९ कुटुंबांतील ४९ सदस्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “कायमस्वरूपी पुनर्वसन हा शेवटचा पर्याय आहे. पुनर्वसनासाठी सर्वप्रथम योग्य जागेची निवड करावी लागेल. ती जागा नागरिकांच्या अपेक्षेनुसार असणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या जागेचा पर्याय प्रथम तपासला जाईल. त्यानंतर आवश्यक असल्यास खासगी जागेचाही विचार केला जाईल. दोन्ही पर्यायांचा अभ्यास करून नागरिकांच्या हिताचे पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”

स्थलांतरित नागरिकांसाठी जिल्हा परिषद शाळेत निवारा, भोजन, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात येत आहे.

दहिवली दुर्घटनेनंतर गोटलवाडीत निर्माण झालेल्या धोक्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून, डोंगराची तांत्रिक तपासणी करून पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *