रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पडवे येथील रहीमत मोहल्ल्यात मोहरमच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी महिलांसह अनेकांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी, गळ्यातील दागिने तोडणे आणि दुखापत केल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकिरा मुस्तफा सारंग (वय ३५, रा. पडवे, रहीमत मोहल्ला, ता. गुहागर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना २६ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री पावणे नऊच्या दरम्यान घडली. सदर गुन्हा दि.8 जुलै 2026 संध्याकाळी 4:30 वाजता करण्यात आला.
मोहरमच्या दिवशी मोहल्ल्यातील एका व्यक्तीचे निधन झाल्यामुळे यौमे अशुरा मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, आरोपी त्यांच्या घरासमोर वाद्य वाजवत असताना फिर्यादी व साक्षीदारांची लहान मुले छोटी मोहरम मिरवणूक घेऊन जात होती. मुलांना पुढे जाण्यासाठी जागा देण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी मुलांवर धावून जात मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मुलांना सोडवण्यासाठी गेलेल्या दिलबर टेमकर यांना कॉलर पकडून खाली पाडण्यात आले, मारहाण करून गळा आवळण्यात आला. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हरवल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शाहिदा सारंग यांना मारहाण करून हात पिरगळण्यात आला, तर कौसर तवसाळकर यांच्या डोक्यात मटका मारून दुखापत करण्यात आल्याचा आरोप आहे. नाझिया जांभारकर यांनाही गळा पकडून जमिनीवर ढकलण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर रात्री सुमारे ८.४५ वाजता आरोपींपैकी काहीजण फिर्यादीच्या घरासमोर येऊन “मुस्तफा व मुनाफ कुठे आहेत, बाहेर या,” असे ओरडत शिवीगाळ करू लागले. फिर्यादी बाहेर आल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या पती व मुलांना जीवे मारण्याची तसेच घर जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहीबाज इकबाल इब्जी, शादाब महबुब भाटकर, मुबीन मलीक इब्जी, मलीक इसाक इब्जी, रुमान अन्वर इब्जी, साईक अन्जम चिपळणकर, कैफ महम्मद शरीफ सारंग, जहुर आदम तांडेल, रफिक लतिफ सारंग, सकावत अन्वर इब्जी, दानिश इरशाद सारंग, आरशिया शहानर टेमकर आणि सहीफा जनेद तवसाळकर (सर्व रा. पडवे, रहीमत मोहल्ला, ता. गुहागर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













