खेडच्या पुरे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली; दोन वर्षांपासून नवीन इमारतीची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

banner 468x60

खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथे मुसळधार पावसात जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने शाळा बंद असल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन वर्षांपासून नवीन शाळा इमारतीच्या मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात कोसळली. घटना घडली त्यावेळी शाळा बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दोन वर्षांपूर्वीच या शाळेच्या इमारतीचा पाया ढासळल्याने ती धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यानंतर नवीन शाळा उभारण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र अद्याप मंजुरी न मिळाल्याने गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे वर्ग गावातील सोसायटीच्या कार्यालयात भरवले जात आहेत.

शिक्षकांनी नवीन शाळा इमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रस्ताव प्रलंबितच असल्याचे सांगितले आहे. अखेर मुसळधार पावसात शाळेची एक खोली कोसळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी शासनाने तातडीने नवीन शाळा इमारतीला मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *