गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
तक्रारीनुसार, शृंगारी मोहल्ला, शृंगारतळी येथील रहिवासी खतिजा अल्ताफ ठाकूर यांचा मुलगा अरकम ठाकूर हा शृंगारी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. शाळेतील प्रार्थनेच्या वेळी शिक्षक अजीम शेख यांनी त्याला पाठांतर म्हणण्यास सांगितले. मात्र पाठांतर न आल्याने संतापलेल्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला हाताने व काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप पालकांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, मारहाणीदरम्यान संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्याचा गळा दाबून दोन वेळा हवेत उचलले आणि त्यानंतर जमिनीवर जोरात आपटले. विशेष म्हणजे, अरकम हा जन्मजात हृदयविकाराचा रुग्ण असून त्याच्या हृदयात छिद्र आहे. त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असल्याने त्याची प्रकृती नाजूक असल्याचा दावा पालकांनी केला आहे. अशा परिस्थितीत झालेल्या या कथित मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून तो मानसिक धक्क्यात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
घरी आल्यानंतर विद्यार्थ्याने आपल्या अंगावरील जखमा पालकांना दाखवत संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी जखमांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये नोंदवून ठेवले आहेत.
या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी पालक शाळेत गेले असता, मुख्याध्यापिकांनी तोंडी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, शाळेतील दुसरे शिक्षक कलीम वणू यांनी पालकांशी उद्धट व अरेरावीची भाषा वापरल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षकांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. घटनेशी संबंधित शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार होण्याची किंवा ते हटविले जाण्याची शक्यता व्यक्त करत, १ जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुहागर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
टीप : या वृत्तातील आरोप हे तक्रारदारांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर आधारित आहेत. संबंधित शिक्षक किंवा शाळा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













