दापोली : एसटी प्रवासात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, वाहकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यात एसटी बस प्रवासादरम्यान अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एसटी वाहकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी दापोली-टांगर मार्गे मुगीज जाणाऱ्या एसटी बसमध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षे १ महिना ४ दिवस वयाची पीडित विद्यार्थिनी महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी दापोली बसस्थानकातून दापोली-टांगर मार्गे मुगीज जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसली होती. ती डाव्या बाजूच्या खिडकीजवळील सीटवर बसली होती. तिच्या शेजारी एक अन्य मुलगी बसली होती; मात्र ती कोथळकोंड येथे उतरली.

त्यानंतर एसटी बसचे वाहक पुंडलिक शिवाजी केंद्रे हे पीडित मुलीच्या शेजारी येऊन बसले. त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने आपली जागा बदलून दुसऱ्या सीटवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित वाहक पुन्हा तिच्या जवळ येऊन बसल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेने आपल्या मैत्रिणीला सोबत बसण्यासाठी बोलावले, मात्र ती येऊ शकली नाही. दरम्यान, गावातील ओळखीचा एक व्यक्ती तिच्या जवळ बसला.

यानंतरही संबंधित वाहक पीडित मुलीच्या सीटसमोर येऊन उभा राहिला. यावेळी पीडितेने त्यांना आपल्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले असता, “गाडी माझी आहे, मी काहीही करेन,” अशा स्वरूपाचे उद्धट वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *