मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील मांदिवली गावात गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. १ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रामचंद्र जालगावकर यांच्या घरासमोर एक मोठे आंब्याचे झाड कोसळून थेट विद्युत वाहिन्यांवर पडले. झाडाचा संपूर्ण भार विद्युत तारांवर आल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, तारा झाडाखाली दबलेल्या अवस्थेत असतानाही पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला असून, घटनेची माहिती त्याच रात्री महावितरणच्या वायरमनला देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वीजपुरवठा बंद करून झाड हटविण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र, तीन दिवस उलटूनही विद्युत तारा धोकादायकरीत्या रस्त्यावर लोंबकळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दुरुस्तीचे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. वीजपुरवठा बंद केल्यास जवळपास चार वाड्यांतील नागरिक अंधारात राहतील, त्यामुळे वीज सुरू ठेवून रस्ता बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. मात्र, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


विशेष म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालक या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे तातडीने विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

घटनेला तीन दिवस उलटूनही जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात गावोगावी फिरणारे लोकप्रतिनिधी आता या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
महावितरण, स्थानिक प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून धोकादायक अवस्थेतील विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













