दापोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. आंजर्ले येथील कोपरीआळी परिसरात शनिवारी (४ जुलै) सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बसला साईड देत असताना एक कार रस्त्यालगतच्या गटारात घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विशेष म्हणजे, याच ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारचा अपघात घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुसळधार पावसामुळे आंजर्लेतील कोपरीआळी येथे, बँक ऑफ इंडिया समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ता आणि बाजूचे गटार यामधील फरक वाहनचालकांना लक्षात येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. एसटी बस किंवा इतर मोठ्या वाहनांना बाजू देताना लहान वाहने थेट गटारात जात असून वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा करावा, रस्त्याच्या कडेला आवश्यक इशारा फलक व सुरक्षा व्यवस्था उभारावी आणि रस्ता स्पष्टपणे दिसेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
“आणखी मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













