दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील बिरवाडी परिसरात गुरुवारी (दि. २ जुलै) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मगर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वन विभाग आणि WAR (Wild Animal Rescuer) संस्थेच्या तत्पर कारवाईमुळे मगर सुरक्षितरीत्या पकडून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मगर दिसल्याची माहिती स्थानिक नागरिक विश्वजीत गुरव यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला दिली. माहिती मिळताच WAR संस्थेचे सदस्य मनित बाईत, प्रतीक बाईत, प्रफुल मिसाळ आणि वैभव बाईत घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी प्रभू साबणे आणि शुभांगी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबविण्यात आली.
बचावकार्यात स्थानिक नागरिक अभिनय केळसकर, अभी पालशेतकर, रुपेश पालशेतकर, निलेश पालशेतकर आणि विश्वजीत गुरव यांनीही सक्रिय सहभाग घेत आवश्यक सहकार्य केले. सर्वांच्या समन्वयातून कोणतीही अप्रिय घटना न घडता मगर सुरक्षितपणे पकडण्यात बचाव पथकाला यश आले.
त्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यप्राण्याचे संरक्षण या दोन्ही बाबींना प्राधान्य देण्यात आले.
या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. परिसरात मगर किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास घाबरून जाऊ नये, त्यांना पकडण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तात्काळ वन विभाग किंवा प्रशिक्षित रेस्क्यू पथकाशी संपर्क साधून योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













