रत्नागिरी जिल्ह्याचा सुपुत्र सागर शिवाजी कळंबटे याने राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करत संपूर्ण कोकणाचा अभिमान उंचावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे आता त्याला राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सागरने हा मानाचा टप्पा गाठला आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ मानले जात असून, त्याच्या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
सागरच्या कबड्डी प्रवासाची सुरुवात कालिका कला क्रीडा मंडळातून झाली. सुरुवातीच्या काळात विविध कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर २०१९ मध्ये त्याने जिल्हा कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
यानंतर २०२२ मध्ये राज्य कबड्डी पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सातत्य कायम ठेवले. अखेर २०२६ मध्ये राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश मिळवत त्याने रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
गेल्या सात वर्षांत सागरने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्याच्या अचूक निर्णयक्षमतेचे आणि निष्पक्ष पंचगिरीचे विशेष कौतुक झाले आहे.
राष्ट्रीय पंच म्हणून देशभरातील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कोकणचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा निर्धार सागरने व्यक्त केला आहे. यासोबतच भविष्यात आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक स्तरावर भारत आणि कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाकांक्षाही त्याने बोलून दाखवली.
सागर कळंबटेच्या या यशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्रीडा संघटना, पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













