रत्नागिरी मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भावे आडोम येथून विद्यार्थ्यांना घेऊन रत्नागिरीकडे येणारी बस फणसवले पवार कोंड परिसरात पोहोचली असता समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. बसमधील विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर स्थानिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले.

स्थानिक नागरिकांनी बसमधील जखमी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी पालकांची एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
या अपघातात सुजल सनगरे (१७), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी विद्यार्थी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून बसचालकांचे जबाब, वाहनांची स्थिती आणि घटनास्थळाची पाहणी करून अपघाताचे कारण शोधले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













