चिपळूण : मिठगिरी मोहल्ल्यात युमे आशुरा निमित्त ताजिया मिरवणूक, भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मिठगिरी मोहल्ला येथे सालाबादप्रमाणे यंदाही युमे आशुरा (मोहरमचा दहावा दिवस) धार्मिक उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरा करण्यात येणार आहे. मोहरम हा इस्लाम धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक दिवस मानला जातो. करबला येथील ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. त्यानिमित्ताने मिठगिरी मोहल्ल्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जून रोजी ताजिया मशिद परिसरात बसविण्यात येणार आहे. त्यानंतर २६ जून रोजी ताजियाची पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक मुरादपूर येथून प्रारंभ होऊन मच्छी मार्केट परिसरात पोहोचेल. त्यानंतर धार्मिक विधीनुसार ताजिया करबला साठी मिठगिरी मोहल्ला येथे नेण्यात येणार आहे.

मोहरमच्या निमित्ताने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विविध भागांतील आशिक-ए-हुसेन मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ताजिया मिरवणुकीदरम्यान मातम, नौहा पठण तसेच इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून देणारे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या पवित्र प्रसंगी सर्व धर्मीय नागरिकांनी तसेच आशिक-ए-हुसेन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी नगरसेवक करामत शेठ मिठगिरी आणि अयान मिठगिरी यांनी केले आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान शिस्त व शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

युमे आशुरा निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे मिठगिरी मोहल्ला परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *