दापोली : डॉ. नंदा जगताप यांचा राष्ट्रीय सन्मान, घरटे संरक्षणासाठी विकसित उपकरणाला केंद्र सरकारचे डिझाईन पेटंट

banner 468x60

पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकविणारी अभिमानास्पद कामगिरी दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. नंदा भूपाल जगताप यांनी केली आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन’ (घरटे संरक्षणासाठी पाळत ठेवणारे उपकरण) या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत राष्ट्रीय डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

banner 728x90

या संशोधनाची नोंद केंद्र सरकारच्या अधिकृत पेटंट जर्नलमध्ये करण्यात आली असून, त्यामुळे दापोली आणि संपूर्ण कोकणच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन्यजीव आणि पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. जंगलातील किंवा दुर्गम भागातील दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, त्यांची अंडी आणि पिल्लांवर सतत देखरेख ठेवण्यास हे उपकरण मदत करणार आहे. तसेच हिंस्त्र प्राणी किंवा इतर धोक्यांपासून घरट्यांचे संरक्षण करण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. संशोधकांच्या मते, पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही व्यत्यय न आणता त्यांचे निरीक्षण आणि संरक्षण करणे हे या उपकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

या उपकरणाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ते सौरऊर्जेवर कार्यरत आहे. त्यामुळे वीजपुरवठा नसलेल्या जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये किंवा डोंगराळ भागातही हे उपकरण सातत्याने काम करू शकते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले हे उपकरण भविष्यात वनविभाग, संशोधन संस्था आणि पक्षी अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

या संशोधनात डॉ. नंदा जगताप यांच्यासोबत देशातील विविध भागांतील नामवंत संशोधकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये डॉ. अमिताभ शाद, निशांत घोडे आणि डॉ. संगीता शर्मा यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संशोधन यशस्वी झाले आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. नंदा जगताप यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, प्रोत्साहनामुळे आणि संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संशोधनाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या दापोली एज्युकेशन सोसायटीच्या पाठबळामुळे आणि महाविद्यालयातील संशोधनपूरक वातावरणामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. नंदा जगताप यांच्या या यशामुळे दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वन्यजीव संवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या संशोधनामुळे भविष्यात दापोलीचे नाव राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक उजळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *