रत्नागिरी : जयगड शिपयार्डमध्ये कामगाराचा शॉक लागून मृत्यू, मोटार दुरुस्तीचे काम करताना दुर्घटना

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड कंपनीत काम करत असताना एका कामगाराचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१६ जून) दुपारी घडली.

सुदिपकुमार सुरेश सिंह (वय २७, रा. हिरापाकडटोला, मंगरहा, मानिकपूर, जिल्हा गोपलगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते इलेक्ट्रोमेंट इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीमार्फत चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड येथे कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्थ क्रमांक ४ वर उभ्या असलेल्या ‘शांतीसागर-१७’ या जहाजाच्या इंजिन रूममधील स्टार बोर्ड इंजिनवरील पंप रूममधील मोटार दुरुस्तीचे काम सुरू असताना सुदिपकुमार सिंह यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले.

घटनास्थळी उपस्थित इतर कामगारांनी त्यांना तत्काळ जहाजाबाहेर काढून कंपनीच्या रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *