दापोली : मुरुडमध्ये नाल्यांमधून टाकलेल्या भूमिगत केबलमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

banner 468x60

मुरुड येथे महावितरणच्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे मुरुड गावात पावसाळ्यापूर्वीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठेकेदाराकडून नाल्यांमधूनच केबल टाकण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन गावात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या मुरुड परिसरात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी केबल नाल्यांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अडल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विशेषतः खालची पाखाडी, वरची पाखाडी आणि भंडारवाडा या भागांमध्ये पाणी तुंबण्याचा धोका अधिक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या भागातील नागरिकांना मुसळधार पावसाच्या वेळी घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती सतावत आहे.

ग्रामस्थांच्या मते, दापोली तालुक्यात महावितरणच्या विविध कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, भूमिगत केबल टाकताना रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि अपूर्ण कामे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता नाल्यांमधून केबल टाकल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

“भूमिगत केबल टाकण्याची ही नेमकी कोणती पद्धत आहे?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी महावितरण आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने नाल्यांमधील केबल हटवून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *