Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर : उमराठच्या समृद्धीचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

banner 468x60

गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द येथील आंबेकरवाडीची कन्या कुमारी समृद्धी सयोजिता सुरेश आंबेकर हिने दहावीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल ग्रामपंचायत उमराठ व उमराठ ग्रामस्थांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत उमराठच्या विशेष सभेत हा सत्कार सोहळा पार पडला. ग्रामपंचायत उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते समृद्धीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक, पेनसेट तसेच पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोप देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उमराठ ग्रामस्थांच्या वतीने गावचे मानकरी अनिल पवार आणि पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांच्या हस्तेही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

समृद्धी आंबेकर ही पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एसएससी परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवत गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे कोणतीही खासगी शिकवणी न लावता केवळ स्वअध्ययन, सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच समृद्धीने वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, क्रीडा, घोषवाक्य स्पर्धा तसेच विज्ञान प्रतिकृती सादरीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये तालुका व विभागस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिला ‘चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार’ तसेच ‘प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार’ देखील प्राप्त झाले आहेत.

सत्काराला उत्तर देताना समृद्धीने भविष्यात आयएएस अधिकारी बनून देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या यशामागील गमक सांगताना तिने नियमित वाचन, दैनंदिन अभ्यास, नियोजनबद्ध तयारी, लेखनाचा सराव, उजळणी आणि चिंतन यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. तसेच शिक्षक, आई-वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.

यावेळी प्रशासक जनार्दन आंबेकर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले आणि गावचे मानकरी अनिल पवार यांनी समृद्धीचे कौतुक करत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात आयएएस अधिकारी बनून उमराठ गावाचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. समृद्धीच्या या यशाबद्दल तालुका आणि जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *