रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून, भक्ती मयेकर हिचा मृतदेह आंबा घाटात नेण्यासाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार मूळ मालकाला परत देण्याचे आदेश रत्नागिरी सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्याने जप्त वाहन दीर्घकाळ पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने मान्य केले.
या प्रकरणात शहर पोलिसांनी तपासादरम्यान एमएच-०८ एएन-५५०१ क्रमांकाची वॅगनार कार जप्त केली होती. खुनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आणि दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर संबंधित वाहन मालकाने न्यायालयात अर्ज करून कार परत मिळण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वाहन मूळ मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
प्रकरणानुसार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (वय २५) हिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात दुर्वास दर्शन पाटील (रा. जंगमवाडी, वाटद-खंडाळा), विश्वास विजय पवार (रा. कळझोंडी बौद्धवाडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा) यांना अटक करण्यात आली होती.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, दुर्वास पाटील आणि भक्ती मयेकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र दुर्वास याचे अन्य एका मुलीसोबत लग्न ठरले होते. भक्ती लग्नासाठी आग्रह धरत असल्याने आपले लग्न मोडेल या भीतीतून दुर्वासने तिचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानुसार त्याने १६ ऑगस्ट २०२५ रोजी भक्तीला खंडाळा येथील सायली बारमध्ये बोलावून घेतले आणि साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला.
खून केल्यानंतर आरोपींनी भक्तीचा मृतदेह वॅगनार कारमधून आंबा घाट परिसरात नेऊन फेकून दिला होता. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पुढील तपासात दुर्वास पाटील याने राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या खुनांमध्येही सहभाग असल्याचे उघडकीस आले आणि हे प्रकरण तिहेरी खून प्रकरण म्हणून समोर आले.
सध्या या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रावर पुढील सुनावणी होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













