दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान; उपचारानंतर समुद्रात केलं मुक्त

banner 468x60

दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी १ जून २०२६ रोजी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) समुद्री कासव किनाऱ्यावर आलेले आढळून आले. पाळंदे गावातील ग्रामस्थ अनिल आरेकर यांनी याबाबत वन विभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कासवाला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

सदर कासवाबाबतची माहिती विभागीय वन अधिकारी कांदळवन कोकण दक्षिण रायगड-अलिबाग कांचन पवार तसेच सहाय्यक वन संरक्षक प्रियांका पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कासवावर उपचार करण्यात आले.

हर्णे येथील वाइल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेचे सदस्य व कांदळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहाद जमादार यांच्या खाऱ्या पाण्याच्या टाकीत तीन दिवस कासवाची देखभाल व उपचार करण्यात आले. उपचारानंतर कासवाची प्रकृती सुधारल्याने ४ जून २०२६ रोजी बोटीच्या सहाय्याने त्याला पुन्हा समुद्रातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

यावेळी अंजर्ले कांदळवन वनरक्षक प्रभू साबणे, दाभोळ कांदळवन वनरक्षक विश्वंभर झाडे, मांग्रो फाउंडेशनचे सहाय्यक उपजीविका तज्ज्ञ अभिनय केळसकर तसेच वाइल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेचे सदस्य आणि कांदळवन सह-व्यवस्थापन समिती, हर्णेचे अध्यक्ष फहाद जमादार उपस्थित होते.

दरम्यान, समुद्री कासव, डॉल्फिन अथवा अन्य कोणताही सागरी जीव अडचणीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा मोबाईल क्रमांक ८६९३० ३४८०३ वर संपर्क साधावा, असे आवाहन कांदळवन कक्ष रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी किरण ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *