खेड : मुंबकेत गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक, 67 हजारांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

खेड तालुक्यातील मुंबके येथे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर खेड पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत ३६४ ग्रॅम सुकलेला गांजा, तीन स्मार्टफोन, गांजा सेवनासाठी वापरण्यात येणाऱ्या चिलीम आणि इतर साहित्य असा एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांना ३ जून रोजी रात्री मुंबके येथील एका खोलीत गांजा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार खेड पोलीस पथकाने रात्री छापा टाकला असता तीन तरुण गांजा विक्रीसाठी आवश्यक साहित्यांसह आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अफजल जहीर कादिरी (२४), सद्दाम अबु बकर दुदुके (२५) आणि अवधूत राजेश घोडे (२६) अशी आहेत. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून ३६४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा जप्त करण्यात आला.

याशिवाय २० हजार रुपयांचा सॅमसंग ए-५३, ३० हजार रुपयांचा रेडमी १४ प्रो मॅक्स, १० हजार रुपयांचा मोटोरोला जी-६७ हे मोबाईल फोन, तीन मातीच्या चिलीम आणि प्लास्टिकच्या पिशव्याही पोलिसांनी जप्त केल्या.

या प्रकरणी पोलीस शिपाई सुरज मोरे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरजिल्हा स्वरूपाच्या या गांजा तस्करी आणि विक्री प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *