गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका ६६ वर्षीय वृद्ध आईवर तिच्याच मुलाने लोखंडी पाट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती शंकर गावडे (वय ६६, रा. पाटपन्हाळे गावडेवाडी, ता. गुहागर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा राजेंद्र शंकर गावडे (वय ४२, रा. पाटपन्हाळे गावडेवाडी, सध्या रा. दिया, जि. ठाणे) हा दारूच्या नशेत घरी येऊन वारंवार शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण करीत असल्याने त्याच्याविरोधात त्यांनी यापूर्वी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राजेंद्र गावडे याने गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घरात येऊन आई पार्वती गावडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर घरातील लोखंडी गाडीचा पाटा उचलून त्यांच्या ढोपराखालील पायावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या.
हल्ल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत, “पोलीसात तक्रार देतेस काय?” असे म्हणत पुन्हा मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













