रत्नागिरी : पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर रत्नागिरीत धडक कारवाई, 38 गुन्हे दाखल, 30 आरोपी जेरबंद

banner 468x60

रत्नागिरी : पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या दुर्घटनेने राज्यभर खळबळ उडाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. २८ मे २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभर धडक कारवाया करण्यात आल्या असून आतापर्यंत ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ३० संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

banner 728x90

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हातभट्टी दारू तयार होणारी ठिकाणे, अवैध मद्यविक्री केंद्रे तसेच मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून कारवाया केल्या. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गावठी दारू, रसायने आणि विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत १,६४० लिटर हातभट्टीची गावठी दारू, १७.६४ बल्क लिटर विदेशी मद्य आणि २३,४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. या रसायनांचा वापर हातभट्टी दारू निर्मितीसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मद्याची अवैध वाहतूक करणारे एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.

या सर्व कारवाईत एकूण ११ लाख ६६ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संबंधितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी व उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मितीविरोधात मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातही विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, दुर्गम भागांतील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे. अवैध मद्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी विभागाकडून सातत्याने गस्त आणि तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभाग यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, बेकायदेशीर मद्यसाठा किंवा बनावट माडी विक्री होत असल्याचे आढळल्यास तातडीने माहिती द्यावी.

यासाठी विभागाने व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ आणि टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ उपलब्ध करून दिले आहेत. अवैध मद्यासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री विभागाकडून देण्यात आली आहे.

अवैध मद्याविरोधातील ही मोहीम पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असून, जिल्ह्यात हातभट्टी दारूचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *