दाभोळ : नादिया रुमाणे यांना प्रतिष्ठेचा ‘आउटरीच ॲम्बेसेडर’ पुरस्कार

banner 468x60

दाभोळ पंचक्रोशीतील पंचनदी कोलथरे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असलेल्या रियाझ रुमाणे व शफीका रुमाणे यांच्या कन्या नादिया रुमाणे हिला University of Hertfordshire या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून ‘आउटरीच ॲम्बेसेडर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक तसेच कोकणवासीयांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नादिया आणि तिची जुळी बहीण नादा रुमाणे या दोघी सध्या युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरमध्ये ‘अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन’ विषयात बीए (ऑनर्स) पदवीचे शिक्षण घेत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध आधुनिक संकल्पना, बालशिक्षण आणि समावेशक शिक्षणपद्धती (Inclusive Education) यामध्ये दोघींनाही विशेष रस असून त्या या क्षेत्रात आपले भविष्य घडवत आहेत.

banner 728x90


नादियाला मिळालेला ‘आउटरीच ॲम्बेसेडर’ पुरस्कार हा तिच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच नेतृत्वगुण, सामाजिक सहभाग आणि विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय योगदानाची दखल म्हणून देण्यात आला आहे. या सन्मानामुळे तिच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


नादियाची आई शफीका रुमाणे या मूळच्या चिपळूण येथील असून गेल्या १५ वर्षांपासून अल खोबर, दम्माम आणि बहरीन परिसरात नर्सरी व किंडरगार्टन क्षेत्रात यशस्वी व्यवसाय करत आहेत. आईच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली दोन्ही मुलींनीही शिक्षण क्षेत्राची वाट निवडली आहे.


विशेष म्हणजे, रुमाणे कुटुंबाने नुकतीच अल खोबर येथे अमेरिकन अभ्यासक्रमावर आधारित आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या Nova International School या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नादिया ‘स्पेशल अँड इन्क्लुसिव्ह एज्युकेशन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार असून विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा तिचा मानस आहे. तर नादा ही एज्युकेशन विषयात मास्टर्स करून भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.


दरम्यान, नादिया आणि नादा यांच्या यशामागे त्यांचे वडील रियाझ रुमाणे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेली २५ वर्षे अल खोबर-दम्माम परिसरात वास्तव्यास असलेले रियाझ रुमाणे हे तेथील कोकणी समाजाच्या एकीकरणासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.


मुलींच्या या यशामुळे रुमाणे कुटुंबाचा तसेच कोकणाचा गौरव वाढला असून समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नादियाला मिळालेला हा सन्मान आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *