मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ काही दिवसांपूर्वी बॉक्साइट वाहतूक करणारा डंपर पलटल्याची घटना ताजी असतानाच आता गावातील अरुंद रस्त्यावर मोठा ट्रेलर अडकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आमखोलकडून मांदिवलीकडे बॉक्साइट घेऊन जाणारा मोठा ट्रेलर काल दुपारी गावातील अरुंद रस्त्यात अडकला होता. रस्ता लहान असल्याने ट्रेलरला मार्ग काढताना मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मांदिवली गावातील रस्ते मोठ्या व जड वाहनांसाठी योग्य नसतानाही मायनिंग कंपनीकडून सातत्याने ट्रेलर आणि डंपरची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर शाळा आणि वस्ती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साइट वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, शाळेच्या वेळेतही वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आल्याने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी मांदिवली येथील उर्दू शाळेत चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बॉक्साइट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाते, अशी माहिती देण्यात आली होती.
मात्र, आज समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शाळा सुरू होत असतानाही बॉक्साइट वाहतूक सुरू असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान प्रशासनाला चुकीची माहिती देण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या डंपर आणि ट्रेलरमुळे विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण होत असून परिसरात धुळ आणि ध्वनी प्रदूषणही वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेकदा शाळेजवळून धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांकडून ओव्हरलोड वाहतूक, नंबर प्लेट नसलेले डंपर, धोकादायक वेग, धुळ व ध्वनी प्रदूषण याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“काल डंपर पलटला, आज ट्रेलर रस्त्यात अडकला… प्रशासन अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी गाव परिसरात मोठ्या ट्रेलर वाहतुकीवर नियंत्रण आणावे, शाळेजवळ जड वाहनांना बंदी घालावी, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











