राजापूर तालुक्यातील महसूल विभागात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन महिला अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मौजे जवळतेथर येथील वडिलोपार्जित जमीन असून त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी त्यांनी फेरफाराचा अर्ज केला होता. या अर्जाच्या मंजुरीसाठी महसूल कार्यालयात पाठपुरावा सुरू असताना १३ मे २०२६ रोजी तक्रारदाराने मिळंद येथील तलाठी कार्यालयात भेट दिली. त्यावेळी कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांनी तक्रारदाराशी चर्चा केली. फेरफार मंजूर करून सातबाऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी मंडळ अधिकारी पूनम जससिंग गावीत (वय ३७) यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगून कोतवाल माने यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी होताच तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १४ मे रोजी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपींकडून २५ हजार रुपयांवरून तडजोड करत २० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार मिळंद तलाठी कार्यालयात गेले असता पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना फोन करून रक्कम मिळाल्याची माहिती दिली. त्यावेळी गावीत यांनीही त्यास संमती दर्शविल्याचे एसीबीच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत दोघींनाही ताब्यात घेतले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, दीपक आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली धनवडे, समिता क्षीरसागर तसेच चालक पोलीस हवालदार प्रशांत कांबळे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













