दापोली तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश करून तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबत १३ मे २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष श्रीपत साळवी (वय ६३, रा. करंजाणी दर्भाचीवाडी, ता. दापोली, सध्या कांदिवली, मुंबई) यांनी दापोली पोलिसांत फिर्याद दिली आहे. साळवी हे निवृत्त असून, त्यांच्या मूळ गावी असलेल्या घरात ही चोरीची घटना घडली. घर बंद असताना किंवा कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामानाची पाहणी करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये फिर्यादी यांच्या मयत आईचे दागिने असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अंदाजे ४ ग्रॅम वजनाची २० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ (नाकातील फुली) तसेच अंदाजे ३ तोळे वजनाची १ लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत चोरीबाबत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरावर तपास सुरू आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













