चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वे स्थानकावर घडलेल्या मोबाईल चोरीच्या घटनेचा रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) वेगाने तपास करत अवघ्या काही वेळातच छडा लावला आहे. या प्रकरणी एका संशयित चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. १२ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आरपीएफकडे दाखल झाली होती. संबंधित प्रवाशाने आपला मोबाईल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चार्जिंग पॉइंटला लावला होता. काही वेळाने परत आल्यानंतर मोबाईल जागेवर नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर प्रवाशाने तातडीने रेल्वे सुरक्षा बलाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ तपास सुरू केला. स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या तपासणीदरम्यान एका संशयित व्यक्तीने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सीसीटीव्हीमधून मिळालेल्या वर्णनाच्या आधारे आरपीएफच्या पथकाने स्थानक परिसरात शोध मोहीम सुरू केली.
या कारवाईत सहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर सिंग आणि हवालदार सचिन गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तांत्रिक माहिती आणि संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेत त्यांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता चोरीला गेलेला मोबाईल आणि सिमकार्ड त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलची किंमत सुमारे १४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्याला पुढील तपासासाठी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आरपीएफच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सतर्कतेमुळे चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













