खेड तालुक्यातील कोतवली येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली असून, एका पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने पतीच्या कथित प्रेमसंबंधाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी सचिन सत्यवान जुवळे याच्याविरोधात खेड पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३२६ (छ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जुवळे याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर परिस्थिती गंभीर बनल्यानंतर पत्नी आणि आरोपीची आई यांनी खेड पोलीस ठाण्यातील महिला कक्षात जाऊन तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून सचिन जुवळे आणि संबंधित तरुणीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या घटनेचा राग सचिनच्या मनात होता. समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावल्याने संतप्त झालेल्या सचिनने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास सचिन जुवळे हा कोतवली येथील राहत्या घरी आला. घराच्या मागील बाजूस असलेला सिमेंटचा दरवाजा तोडून त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर घर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने त्याने ज्वलनशील पदार्थाचा वापर करून घराला आग लावली.
आग काही क्षणांतच भडकली आणि संपूर्ण घराने पेट घेतला. घराच्या छपरातील लाकडी भाले जळून खाक झाले, तर छपरावरील सर्व कौले खाली कोसळली. घरातील फर्निचर, कपडे, धान्य, भांडी तसेच इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोतवली परिसरात मोठी चर्चा रंगली असून, कौटुंबिक वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













