रत्नागिरी-पावस मार्गावर हॉटेल आनंदसमोर रविवारी (१० मे) सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन महिला आणि एका सहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती.
तेजश्री अमित मोहिले (वय ३६), तीर्था मुरकर (वय ६५) आणि महिशा अमित मोहिले (वय ६, सर्व रा. शांतिनगर, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री मोहिले या आपल्या ताब्यातील दुचाकीवरून तीर्था मुरकर आणि मुलगी महिशा यांना घेऊन रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जात होत्या. त्या हॉटेल आनंदसमोर पोहोचल्या असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच-०५-एफजे-३१९८) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या कारने थेट समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातामुळे दुचाकी काही अंतरावर फेकली गेली, तर कारच्या पुढील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर जखमी महिला आणि चिमुकली रस्त्यावर पडल्याने घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
या अपघाताची नोंद रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे. तसेच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण आणि कार चालकाची जबाबदारी याबाबत अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













