तळा तालुक्यातील कर्नाळा येथे शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून वेदांत भोसले या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे वेदांत हा वाड्याजवळील पेंढे झाकण्यासाठी गेला होता. पेंढे झाकून झाल्यानंतर जवळच पडलेले आंबे उचलण्यासाठी जात असताना अचानक त्याच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ वेदांतला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वेदांत हा अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा होता, अशी माहिती शिक्षक व ग्रामस्थांनी दिली. त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार आणि शाळेतही शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विविध राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ग्रामस्थांनी शासनाकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामीण भागात हवामान पूर्वसूचना यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी जनजागृती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













